Maruti Stotra In Marathi
भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दुःखहारी दुत वैष्णव गायका ||२||
दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदांतरा |
पाताळदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ||४||
ध्वजांगे उचली बाहो आवेशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी देखतां कांपती भयें ||५||
ब्रह्मांडे माईलें नेणों आवळे दंतपंगती |
नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||
पुच्छ ते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटी कांसोटी घंटा किंकिणी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू |
चपळांग पाहतां मोठे महाविद्युल्लतेपरी ||८||
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ||९||
आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती |
मनासी टाकिलें मागें गतीसी तुळणा नसे ||१०||
अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे मेरू मंदार धाकुटे ||११||
ब्रह्मांडाभोवतें वेढें वज्रपुच्छें करू शकें |
तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिलें डोळा ग्रासिलें सूर्यमंडळा |
वाढतां वाढतां वाढें भेदिलें शून्यमंडळा ||१३||
धनधान्य पशूवृद्धि पुत्रपौत्र समग्रही |
पावती रूपविद्यादी स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
भूतप्रेतसमंधादी रोगव्याधी समस्तही |
नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें ||१५||
हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो संख्या चन्द्रकळागुणें ||१६||
रामदासी अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू |
रामरूपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती ||१७||
॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।